पुणे : सण आणि उत्सवांमध्ये कोणतीही हिंसा योग्य नाही. सण जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीनेच साजरे झाले पाहिजेत. उत्सवात सुरू झालेल्या काही चुकीच्या पद्धती एकदम बंद करता येत नाहीत, मात्र लोकांना विश्वासात घेऊन यावर योग्य तोडगा काढला जाईल," अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना मांडली.
पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच डीजेच्या आवाजाने भूकंप आल्यासारखा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी सरकार ध्वनिप्रदूषण रोखण्यास प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. चर्चेतून आता मार्ग काढत आहोत. पुढील काळात नक्कीच याबाबत धोरण आखले जाईल. बापट यांच्या भाषेबाबत बोलताना, त्यांनी विचार मांडताना सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
दुसरीकडे, दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी डीजे आणि ध्वनी मर्यादेबाबत कठोर नियमावली जाहीर केली आहे. धुळे, सोलापूर, नागपूर आणि नवी मुंबई येथे डीजेवर बंदी असताना पुण्यात 'चार बेस आणि चार टॉप'च्या पुढे ध्वनियंत्रणा उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेश कला क्रीडा मंच येथील समन्वय बैठकीत सांगितले की, डेसिबल मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होईल. तसेच प्रेशर मीड, प्लाझ्मा आणि लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करत आयुक्तांनी विसर्जन मिरवणुकीत अश्लील कार्यक्रमांना थारा दिला जाणार नसल्याचा इशारा दिला. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि अलका टॉकीज चौकात गर्दी व वाहतूक नियंत्रणावर पोलिसांचा विशेष भर असेल. मंडळांनी सोशल मीडियावर संयम बाळगावा आणि अमली पदार्थविरोधी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.